Inspirational Stories
डॉ . रुपाली गणपत माने.
( सहायक आयुक्त वन विभाग )
‘आमच्या घरातून, आमच्या गावातून PhD पर्यंत शिक्षण घेऊन अधिकारी होणारी पहिलीच मुलगी अशी माझी ओळख करून देते माझी आई. आपली मुलगी दहावी बारावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कानी पास व्हावी म्हणुन तिला घरातील किंवा शेतातील काहीच काम सांगायची नाही असा नियम बनवणारी माझी आई. राज्यसेवा परीक्षेचा निकाल ऐकून आईच्या डोळ्यातून जे आनंदाश्रु आले, तेच माझ्या प्रवासाची ओळख करून देतात. एव्हढ्या नामांकित संस्थेतून, फिजिक्स मधून PhD मिळवणारी आणि राज्यसेवा परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर निवड होणार (मुलींमधून प्रथम) कदाचित मी पहिलीच मुलगी असेन.
माझा जन्म सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुांबात झाला. आई , बाबा आणि आम्ही तीन भावंडे असे आमचे कुटुंब . पदवी पर्यंतच शिक्षण गावातील जिह्वा परिषद शाळा , कन्याशाळा (सातारा) व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स इथून पूर्ण केले . आई -बाबा दोघेही लिहिण्या – वाचण्या इतपत शिकलेले असूनही आपल्या मुलाांनी खूप शिकावे हे त्यांच्या वागण्यातून दिसत असे. बाबा शेतीकामासोबत मिळेल ते काम करायचे. आई एक उत्तम गृहिणी असून ती स्वतःच्या तसेच इतरांचा शेतातील मोलमजुरी करत असे. आम्ही भावंडे आई- बाबाांना शेती कामात मदत करायचो. आई- बाबा आम्हाला नकळत श्रमप्रतिष्ठा काय असते हे शिकवत होते. माझे कुटुंब ज्या परिस्थितीत जगत होते तेथे उच्चशिक्षित होणे एक अशक्य स्वप्न होते. पण आमचे पालक, आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ते शिक्षणातूनच शक्य होईल याची जाणीव सतत करून देत.अणि म्हणूनच खडतर प्रवास करून आम्ही तिघे भावंडे उच्चशिक्षित होऊ शकलो .
फिजिक्स या विषयामध्ये शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर स्वयांसेवी संस्थांच्या मदतीने मी एम्. एस्. सी पूर्ण केले . मला मुंबई विद्यापीठातून एम्. एस्. सी ( MSc. Nuclear Physics) साठी प्रवेश मिळाला . अणुऊर्जा व अणुबॉम्ब बद्द्ल कुतूहल मला भाभा अणुसंशोधन संस्था , मुंबई येथे संशोधन करायला प्रोतसाहन देत होते. 2017 मध्ये मला मोलेक्यलर सायन्स विषयातून PhD पदवी प्राप्त झाली.
महाविद्यालय तसेच PhD काळात, माझ्या मित्रमैत्रिणींना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना पाहत असे. पण तेव्हा ते नक्की काय अभ्यास करतात हेही कळायचां नाही. घराची परिस्थिती आणि या परीक्षाांसाठी लागणारा वेळ व पैसा याची उणीव स्पष्ट दिसत होती. PhD पूर्ण झाल्यावर आर्थिक परिस्थिती, स्वतःवरील विश्वास , घरातून मिळणारे प्रोत्साहान याांमुळे MPSC चा अभ्यास सुरू करायचा हे ठरवले. मग सकारात्मक विचार करून वयाच्या 31 व्या वर्षी MPSC ची तयारी सुरू केली.
राज्यसेवा परीक्षेची तयारी कोचिंग शिवाय करण्याची ठरवले. फिजिक्स मधून PhD केल्यावर इतिहास , अर्थशास्र , मानव विकास या विषयांच्या करताना खूप अभ्यास करावा लागला. पण तेव्हा मला माझ्या शैक्षणिक प्रवासातील अनुभवांचा खूप फायदा झाला. संयम , कष्ट करण्याची तयारी आणि सहनशीलता या गुणाांचा फायदा नक्कीच झाला.स्पर्धा परीक्षाांचा काळातील यशापयशाची प्रत्येक पायरी आपल्या संयमाची परीक्षा घेत असते. या दरम्यान माझ्या बाबांचे निधन झाले. दुःखाला आवर घालून अभ्यास करत राहणे किती अवघड असते हे अनुभवले. या परिस्थिती माझ्यासाठी हा सर्व प्रवास अशक्य असाच होता.
या काळात मी जेव्हा कधी खूप निराश व्हायचे, जेव्हा मला अभ्यास करायचा की नाही असा प्रश्न पडायचा तेव्हा मी स्वतःला एक उदाहरण द्यायचे. मी माझ्या आईबाबाांना एक शेतकरी म्हणून माझ्या लहानपणापासून बघते. पावसाच्या पाण्यावर शेती करण्याचे धाडस करणारा शेतकरी पाऊस आल्यावर अचानक शेतीमध्ये पेरणी करत नाही . तर तो रखरखतया उन्हात दिवसभर राबून ते शेत पेरणीसाठी तयार करतो. आणि पाऊस पडला कि पेरणी करतो . म्हणजे पेरणी तर काही तास किंवा दिवसातच पूर्ण होते . पण तो शेतकरी , पाऊस पडेल अश्या विश्वासाने शेतीचे मशागत करतो . स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी वाचन, सराव व चिंतन करणे महत्त्वाचेअसते. म्हणजे परीक्षा हे एकच ध्येय समोर ठेवूनशेतकर्त्यांसारखी तयारी करत राहणे.
विज्ञान व प्रशासन या जोडीचा वापर शाश्वत विकास ध्येय प्राप्त करण्यासाठी अत्यावश्यकच बनला आहे. संशोधन क्षेत्रातील मिळालेला अनुभव मला ऐकविसाव्या शतकातील महिला व बालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कामी येतील असे मला वाटते. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना ‘Without Mass no Gravity’, म्हणजेच आपण ज्या सर्वसामान्य लोकाांसाठी काम करणार आहोत, तेआपल्या सोबत असतील तरच आपले कार्य सफल होईल असे मला वाटते.
मी केंद्रीय वन सेवा अकादमी, देहरादनू येथे सहायक वनसंरक्षक (ACF) म्हणुन प्रशिक्षण घेत आहे. तसेच माझी सहायक राज्य कर आयुक्त (ACST,राज्यसेवा 2020, Rank 3) आणि सहायक आयुक्त, महानगरपालिका (Asst. Commissioner, राज्यसेवा 2021) या पदाांसाठी निवड झाली आहे.